Saturday 31 December 2011

व्यक्ती तितक्या प्रकृती

व्यक्ती तितक्या प्रकृती 
प्रवासात खिडकीला लागून जागा मिळाली तर प्रवासाचा कंटाळा बराच कमी होतो.असेच एकदा मी आणि माझी मैत्रीणबसमधून पाचेक तासांच्या प्रवासाला निघालो होतो.गप्पांची टकळी अखंड चालू होती हे अधिक सांगणे न लगे.
त्या प्रवासातला एक प्रसंग आठवला.रस्त्यालगत कुणा अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवाने अपघात झाला होता.चारचाकी गाडीची धडक बसल्याने डोक्यातून रक्त येत होत.त्याना दवाखान्यात नेण्यासाठी लोकांची गडबड सुरु होती.आमची बस तिथून पुढे निघाली आणि प्रत्येकाने आपापली मत मांडायला सुरुवात केली.
एक आजोबा म्हणजे 'तरुण पोर आजकालची,न धड बघून चालतात न धड गाड्या चालवतात.'माझ्या मनात विचार आला 'म्हणजे फक्त तरुणांचेच अपघात होतात का?'
'ठोकणारा पाळून गेला असेल साला' इति कुणी काकाश्री.
भले! न पाहता,न ऐकता बेछूट आरोप!
त्यांच वाक्य तोडत एक काकू उद्गारल्या,'घरी कळाल असेल का त्या मुलाच्या?आई बापांच्या जीवाला किती काळजी!'
त्या माउलीला त्याक्षणी  डोळ्यासमोर स्वत:ची मुलं दिसत असावीत!
त्यानंतर भारतातले रस्ते,पावसाळा,गाड्यांचे वेग इथ पासून वाहनांचे कायदे,जबाबदारीची जाणीव पर्यंत
अनेकविध विषयांवर चर्चा झाली.तोपर्यंत गप्प बसलेल्या मैत्रिणीला कोपराने ढोसल,म्हटलं किस दुनियामे हो?
तर madam च्या डोक्यात निराळच काहीतरी चालू होत! म्हणाली,'असे अपघात झाल्यावर ब्लड ग्रुप पाहून पुढची शोधाशोधकरण्यात खूप धावपळ होते,त्यात वेळ जातो.त्यासाठी एखाद अस software  डेव्हलप करूया.....म्हणजे त्यात एका तालुक्यामधल्या ब्लड बँक,हॉस्पिटल्स आणि डोनर्स यांची पूर्ण माहिती असेल.त्यांना contact करता येईल अशी व्यवस्था असेल.'
मी अवाकच! हात जोडले.म्हटलं कुठून सुचलं तुला हे इतक्या कमी वेळात?ती छान हसली.
माझ्या लक्षात आल, एखादी समस्या पाहिल्यावर त्याच्यावर नुसती चर्चा करणे किंवा अमुक चुकतंय,
तमुक सुधारणा व्हायला हवी याची चर्चा करण्यापेक्षा त्यातून एखादी सुधारणेचा एखादा मार्ग शोधणे, निदान 
आपल्या परीने तसा प्रयत्न करणे जास्त महत्वाच आहे.

Tuesday 27 December 2011

हितगुज

१९ आणि २० तारखेला आश्रम शाळेत मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने कर्जतला जाण झाल.
कर्जत पासून दूर आंबिवली या ठिकाणी तीन आश्रम शाळांना आणि एका आदिवासी पाड्याला भेट दिली.
आश्रमशाळा आणि शाळा....... प्रचंड फरक आहे.आपण धावत पळत,आईने दिलेला डबा घेऊन,मित्र मैत्रीणीना हाक मारत शाळेत जायचो,आश्रम शाळेत  केवळ शिक्षणाच्या प्रबळ इच्छेपोटी घरापासून दूर राहणारी,भवतालच्या डोंगर दरयांची चित्र काढणारी,त्यावर कविता रचणारी मुलं पाहिली.'दहावी पास होणे' हेच त्यांच्यासाठी उच्च ध्येय आणि ज्यांना दोन वेळ पोटभर जेवायला मिळत ते सुखी कुटुंब! सातवी-आठवी पास/नापास  मुलींची लग्न यात कुणालाच काही नाविन्य वाटत नाही.
    अशावेळी आपल्या सुखांच्या कल्पनान्सोबत नकळत त्या स्वप्नांची तुलना होते.मोठमोठ्या लाकडाच्या मोळ्या (वजन साधारण नव्वद ते शंभर किलो) उचलणाऱ्या निरागस पऱ्या पाहून 'पा.... च किलो दळण?मला नाही जमणार आणायला' या स्वत:च्या वक्तव्याची उगाचच आठवण येते.इतक्यात कोणीतरी 'आता गावात रिक्षा आली ना..... सोय झाली पाच किलोमीटर वर! नाही तर आधी दहा किलोमीटर चालावं लागायचं.' अस म्हणत .... आता मला वेगळेच प्रश्न पडू लागतात....
खरंच आपण स्वतंत्र होऊन साठहून अधिक वर्ष उलटली?मग रस्ता आणि वीज या दोनच गोष्टी आदिवासींच्या पदरात? आणि त्यात ते धन्यताही मानतात!मग काही दशकांनी दुर्दैवाने आपण पारतंत्र्यात गेलो तर त्यांना खरंच फरक पडेल?
     प्राचीन काळी भारतात विविध समाज आणि प्रांत होते.तिथल्या तिथल्या राजे रजवाड्यांना केवळ स्वत:च्या राज्याची चिंता असायची.बाजूच्या राज्याशी काही घेण देण नाही... असलच तर वैर!  याचा पुरेपूर फायदा परकीयांनी उठवला!
पण पेटून उठतानाही सबंध देश एक व्ह्यायला खूप वेळ लागला.आपल्याच देश बांधवांबद्दल 'मला काय त्याच?'ही भावना होती. किसको दूसरों की पडी हैं? म्हणतात ना त्यापैकी! म्हणूनच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडताना काही जणांनी संसार फुंकून टाकले तर काहींनी ब्रिटीशांच्या हाताखाली राबत 'फायर' च्या तालावर स्वत:च्याच बांधवाना मारण्यात धन्यता मानली! अखेर...लुटण्यासारख काही राहिलं नाही.... आपल्याला देशाला फाडून,पुरेशी हिंसा आणि धार्मिक द्वेष  पसरवून साहेब परत फिरला.
 पण.......
 देश पारतंत्र्यात होता आणि देश स्वतंत्र झाला या दोन्ही परिस्थितींचा तेव्हाही पुं.लं.च्या 'अंतू बर्वा' ला काही फरक पडला नाही.
कारण त्याला दोन्ही वेळा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होतीच! साहेब होता तेव्हाही आणि साहेब गेला तेव्हाही! मग आज इतक्या वर्षांनंतर परिस्थिती वेगळी आहे का?
   राजे राजवाड्यांची जागा घोटाळा किंग्सनी घेतली आहे.अजूनही देशाचे सीमाप्रश्न अनुत्तरीत आहेत.महानगरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.सामान्य माणूस जगण्यासाठीच इतका संघर्ष करतो....शिक्षण,नोकरी,महागाई.... यात त्याला सामाजिक प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळच नाही.मग वंचित घटकांकडे कोण पाहणार? काही स्वयंसेवी संस्था आणि खरंच विकासाची तळमळ असणारे अधिकारी यांच्या आधारावर त्यांची प्रगती मूळ धरत आहे.ही परिस्थिती बदलेल?