Saturday 14 January 2012

सकाळचा प्रकाश!


सकाळचा प्रकाश!
सकाळ सोशल फौंडेशनच्या कार्यक्रमामुळे श्री. प्रवीण कसोटे सर व गरद सर यांच्या समवेत पाथरस ,पिंगळस आणि भालेवडीयेथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला.सुरुवातीला बुजलेली मुलं प्रवीण सरांच्या सुरेल आवाजातील अभंगात स्वत:चा आवाज मिसळू लागली तेव्हा लक्षात आल की त्यांच्या काळाने घेतल्यास ती अभ्यास आणि करिअरबद्दल मार्गदर्शनाच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद देतील.व्याख्यान म्हणण्या पेक्षा अभ्यासातील अडचणी आणि करिअर निवड या  विषयांवर त्यांच्याशी छान गप्पा टप्पा झाल्या!
    मुलांनी गप्पा मारल्या,आपापल्या शंका विचारल्या.... नंतर बराच वेळ कोपऱ्यात ताटकळलेला,गबाळ्या अवतारातला एक  मुलगा पुढे आला आणि म्हणाला,'मादाम,मला अक्षय कुमार व्ह्यायाचय.काय करू त्यासाठी?'आजूबाजूची मुलं हसली,पण 'अरे,त्यात चूक काय आहे,छान स्वप्न आहे त्याच' म्हणत तिथल्या एका मादामनीत्याची बाजू लावून धरली.इतर मुलांची कुजबुज शांत झाल्यावर मी त्याला चित्रपट क्षेत्रातली आणि make up artist सारख्याकाही कोर्सेसची माहिती दिली.थोड बोलण सुरु झाल्यावर त्याच्या तोंडून बाहेर पडल ,'मला आईला लवकरात लवकर मोठ्ठ्या घरात राहायला न्यायचं आहे.शिकून नोकरी शोधायला तर खूप वर्ष लागतील ना! '
मी दोन मिनिट blank च झाले.तो गेल्यावर मघाच्या त्या मादामनी सांगितलं,त्या मुलाचे वडील वारल्यानंतर तो आणि त्याची आई त्याच्या मामाच्या घरी राहायला आले.त्यांचाही घर लहान,परिस्थिती बेतास.कसबस याला शिकायला इकडे पाठवलंय.
         काही वेळा पूर्वी त्याच्या प्रश्नाने माझ्या मनात शंकाच जाळ पसरलं होत.अगदी, टी.व्ही. मुळे मुलं अभ्यास सोडून इतरचगोष्टींचा जास्त विचार करतात इथपर्यंत बरच काही डोकावून गेलेलं.पण आत्ता त्याचा साधा सरळ लॉजिकल विचार माझ्या पर्यंत पोचला.आणि 'आईला मोठ्या घरात न्यायचं आहे' या स्वप्नाच अपार कौतुक वाटू लागल.हळू हळू कळाल ही मुलं वंचित घटकातली होती पण त्याच्या स्वप्नांची झेप खूप मोठी.....कुणी आजूबाजूच्या निसर्गावर कविता रचायच,कुणाच्या हातात मेंदी रेखाटण्याची कला,कुणी उत्तम स्वयंपाकी....
         किती यादी देऊ!! बाहेर पडताना पुन्हा एकदा आशा आकांक्षाना, स्वप्नांना कुंपण नसत हे कळाल.
खरंच, 'सकाळ' मुळे मुलांना भारतातला इंडिया  आणि मला इंडियातला भारत दिसला!