Wednesday, 23 May 2012

वय आणि मैत्री


आजच्या तरुण पिढीत म्हणजे वयाच्या २० ते ३५ वर्ष या दरम्यान (राजकारणात चाळीशीला 'युवा' म्हणायला सुरुवात करतात म्हणून आधीच स्पष्ट केल.....)असणाऱ्या पिढीत आढळणाऱ्या काही कॉमन गोष्टी आहेत.त्यातली एक सकारात्मक कॉमन गोष्ट म्हणेज मैत्रीच पक्क नात!कॉलेजमध्ये जास्त वेळ मित्र मैत्रिणींसोबत असल्यामुळे/घरात एकाच भाऊ-बहिण किंवा एकुलत एक मुलं असल्यामुळे/समवैचारिकता/विचार शेअर करताना असणारा मोकळेपणा.......... मैत्रीसाठी कारणं यापैकी काहीही किंवा सगळी देखील असू शकतात.पण हा मोकळेपणा आज पुढच्या पिढीत दिसत नाही (नावं ठेवण्याचा मक्ता मोठ्यानीच घेतलेला नाही,आम्हालाही त्यांच्या बद्दल काहीतरी सुचू शकत ;) म्हणजे आज पन्नाशीला आलेले लोक नव्याने मैत्री करताना फारसे 'ओपन' होताना दिसत नाहीत.चाळीशीत असणारी पिढी जुन्या ग्रुप सोबत जास्त रमते.
        मग आपण कसे बर पटकन मिळून मिसळून वागतो?नुकतीच ओळख झाली असली तर 'वेळेवर ये कॉलेजला/नाईस मोबाईल' पर्यंत संभाषण असत.हीच ओळख वाढली,पक्की मैत्री झाली की ऐकायला मिळणारे शब्द खास असतात.केवळ मुलांचा ग्रुप असेल तर फुल्या फुल्यांवर भर जास्त!मुला मुलींचा असेल तर 'तुला अक्कल नाही/कोण कडमडायला सांगताय/मला सांगायचं होत/एकदम कडक लुक आहे आज!' इ.इ.या शब्दांवरून मला जाणवलेली गोष्ट अशी की तरुण वयात आपण आपल यश शेअर करायला आणि निर्णय योग्य/अयोग्य याची चर्चा मित्र मैत्रिणीन बरोबर करताना निवांत असतो,अवघडत नाही.कुणी सल्ले देताय,कुणी वेड्यात काढतंय,कुणी 'मला हाक मार' म्हणतंय.....अशी सगळी मत आपण ऐकून घेतो....
       मग वयानुसार हा 'openness' कमी होतो का? यासाठी ऑफिस मध्ये सहकाऱ्यान बरोबर स्पर्धा असते म्हणून त्यांच्याशी वैयक्तिक काही बोलता येत नाही हा युक्तिवाद जरी मान्य केला तरी ऑफिस व्यतिरिक्त इतरत्र नव्या ओळखी झाल्यावर  कितपत उत्सुकता दाखवली जाते?की स्वत:ची मत,निर्णय याबद्दल काहीही शेअर करायची इच्छा नसते,कोण काय म्हणेल अस वाटत?नव्या ओळखीत बऱ्याच वेळा समोरच्याची आर्थिक पात,त्याचा आपल्या बिझनेसशी संबंध आहे का? इत्यादी बाबींची चाचपणी केली जाते.टी ओळख मैत्रीपर्यंत वाढतेच अस नाही.या मानाने स्त्रियांचं बर असत.त्यांची चाळीशीतली  नवी ओळख.... लोकल ट्रेन-बस स्टोप वरची ओळख -पाल्याचे पालक यांच्याशी झालेली ओळख जुजबी असली तरी त्या हवा पाण्याच्या गप्पा मारू शकतात.त्यात जर माहेर एकाच तालुक्यात-जिल्ह्यात  असेल तर तो जिव्हाळा वाढून त्या काही वैयक्तिक बाबीही शेअर करतात!
       व.पुं.च्या एका गोष्टीत चाळीशीचे दोन पुरुष पार्टीत ओळख झाल्यावर गप्पा मारत असतात.तेव्हा एक जण दुसऱ्याला म्हणतो,'आपण एकाच वयाचे आहोत.अरे जारे म्हण.आपुलकी वाढते.'दुसरा विचारात पडतो,म्हणतो 'खरंच,काही हरकत नाही.पण आपल्याकडे अशी रूढ पद्धत का नाहीये?' त्यावर पहिला म्हणतो,'शिष्टाचार!समवयस्क लोकांनी एकमेकांना अरे- जारे म्हटलं तर आश्चर्य आणि जर स्त्री-पुरुषांनी म्हटलं तर गह्जबच!' आज वीस पंचवीस वर्ष नंतरही पुणे-मुंबई सारखी मोजकी दोन तीन शहर आणि त्यातल्या मोठ्या कंपन्यांचा अपवाद वगळला तर परिस्थिती हीच आहे!
यावर विचार करता येईलच पण आजच ठरवूया....पुढच्या पिढीच काय माहित नाही पण आपण तरी काही वर्षांनी एकमेकान बरोबर मनमोकळ्या गप्पा मारायला हव्या!