Wednesday 23 May 2012

वय आणि मैत्री


आजच्या तरुण पिढीत म्हणजे वयाच्या २० ते ३५ वर्ष या दरम्यान (राजकारणात चाळीशीला 'युवा' म्हणायला सुरुवात करतात म्हणून आधीच स्पष्ट केल.....)असणाऱ्या पिढीत आढळणाऱ्या काही कॉमन गोष्टी आहेत.त्यातली एक सकारात्मक कॉमन गोष्ट म्हणेज मैत्रीच पक्क नात!कॉलेजमध्ये जास्त वेळ मित्र मैत्रिणींसोबत असल्यामुळे/घरात एकाच भाऊ-बहिण किंवा एकुलत एक मुलं असल्यामुळे/समवैचारिकता/विचार शेअर करताना असणारा मोकळेपणा.......... मैत्रीसाठी कारणं यापैकी काहीही किंवा सगळी देखील असू शकतात.पण हा मोकळेपणा आज पुढच्या पिढीत दिसत नाही (नावं ठेवण्याचा मक्ता मोठ्यानीच घेतलेला नाही,आम्हालाही त्यांच्या बद्दल काहीतरी सुचू शकत ;) म्हणजे आज पन्नाशीला आलेले लोक नव्याने मैत्री करताना फारसे 'ओपन' होताना दिसत नाहीत.चाळीशीत असणारी पिढी जुन्या ग्रुप सोबत जास्त रमते.
        मग आपण कसे बर पटकन मिळून मिसळून वागतो?नुकतीच ओळख झाली असली तर 'वेळेवर ये कॉलेजला/नाईस मोबाईल' पर्यंत संभाषण असत.हीच ओळख वाढली,पक्की मैत्री झाली की ऐकायला मिळणारे शब्द खास असतात.केवळ मुलांचा ग्रुप असेल तर फुल्या फुल्यांवर भर जास्त!मुला मुलींचा असेल तर 'तुला अक्कल नाही/कोण कडमडायला सांगताय/मला सांगायचं होत/एकदम कडक लुक आहे आज!' इ.इ.या शब्दांवरून मला जाणवलेली गोष्ट अशी की तरुण वयात आपण आपल यश शेअर करायला आणि निर्णय योग्य/अयोग्य याची चर्चा मित्र मैत्रिणीन बरोबर करताना निवांत असतो,अवघडत नाही.कुणी सल्ले देताय,कुणी वेड्यात काढतंय,कुणी 'मला हाक मार' म्हणतंय.....अशी सगळी मत आपण ऐकून घेतो....
       मग वयानुसार हा 'openness' कमी होतो का? यासाठी ऑफिस मध्ये सहकाऱ्यान बरोबर स्पर्धा असते म्हणून त्यांच्याशी वैयक्तिक काही बोलता येत नाही हा युक्तिवाद जरी मान्य केला तरी ऑफिस व्यतिरिक्त इतरत्र नव्या ओळखी झाल्यावर  कितपत उत्सुकता दाखवली जाते?की स्वत:ची मत,निर्णय याबद्दल काहीही शेअर करायची इच्छा नसते,कोण काय म्हणेल अस वाटत?नव्या ओळखीत बऱ्याच वेळा समोरच्याची आर्थिक पात,त्याचा आपल्या बिझनेसशी संबंध आहे का? इत्यादी बाबींची चाचपणी केली जाते.टी ओळख मैत्रीपर्यंत वाढतेच अस नाही.या मानाने स्त्रियांचं बर असत.त्यांची चाळीशीतली  नवी ओळख.... लोकल ट्रेन-बस स्टोप वरची ओळख -पाल्याचे पालक यांच्याशी झालेली ओळख जुजबी असली तरी त्या हवा पाण्याच्या गप्पा मारू शकतात.त्यात जर माहेर एकाच तालुक्यात-जिल्ह्यात  असेल तर तो जिव्हाळा वाढून त्या काही वैयक्तिक बाबीही शेअर करतात!
       व.पुं.च्या एका गोष्टीत चाळीशीचे दोन पुरुष पार्टीत ओळख झाल्यावर गप्पा मारत असतात.तेव्हा एक जण दुसऱ्याला म्हणतो,'आपण एकाच वयाचे आहोत.अरे जारे म्हण.आपुलकी वाढते.'दुसरा विचारात पडतो,म्हणतो 'खरंच,काही हरकत नाही.पण आपल्याकडे अशी रूढ पद्धत का नाहीये?' त्यावर पहिला म्हणतो,'शिष्टाचार!समवयस्क लोकांनी एकमेकांना अरे- जारे म्हटलं तर आश्चर्य आणि जर स्त्री-पुरुषांनी म्हटलं तर गह्जबच!' आज वीस पंचवीस वर्ष नंतरही पुणे-मुंबई सारखी मोजकी दोन तीन शहर आणि त्यातल्या मोठ्या कंपन्यांचा अपवाद वगळला तर परिस्थिती हीच आहे!
यावर विचार करता येईलच पण आजच ठरवूया....पुढच्या पिढीच काय माहित नाही पण आपण तरी काही वर्षांनी एकमेकान बरोबर मनमोकळ्या गप्पा मारायला हव्या!

Tuesday 27 March 2012

उद्याचे बोक्या सातबंडे


उद्याचे बोक्या सातबंडे 
 प्रभावळकरांचा 'बोक्या सातबंडे'चा संच  बऱ्याच वर्षांनी हातात पाडला.आपण मोठे झालो तरी लहानपणी रम्य वाटणाऱ्या बोक्याच्या गमती पुन्हा वाचायला तितकीच मजा येते.बोक्याचा  चुणचुणीतपणा आणि तो शेंडेफळ असल्याने त्याचे होणारे लाड,मोठ्या भावाच त्याच्यावर डाफरण,बोक्यालाही धाक वाटणारे त्याचे बाबा, प्रेमळ आई आणि 'चिन्मायानंदा' या खऱ्या नावाने  हाक मारणारी एकमेव व्यक्ती म्हणजे त्याची आजी. या सर्वांच अगदी चपखल आणि या व्यक्तिरेखा खऱ्या वाटाव्यात अस चित्रण प्रभावळकरांनी केल आहे.बोक्याच्या अनेक उचापतींपैकी एक म्हणजे तो कामवाल्या मावशींच्या मुलांबद्दल त्यांच्याच तोंडून तक्रारी ऐकतो, 'माझी पोरं उगा दरदिवशी काहीबाही मागत रहात्यात 'ही कामवाल्या मावशींची तक्रार त्याला अजिबात अनैसर्गिक वाटत नाही, उलट रास्तच वाटते'. त्या मुलानाही आपल्या प्रमाणे सुटीत मजा का करता येऊ नये?' असा भाबडा प्रश्न त्याला पडतो.पण प्रश्नच उत्तर शोधणार नाही तो बोक्या कसला?उन्हाळाच्या सुटीत बोक्या आणि त्याचे मित्र मैत्रिणी आजूबाजूच्या गरीब मुलांना,कॉलनीत येणाऱ्या सगळ्या कामवाल्या मावशींच्या मुलामुलींना एकत्र करतात.आपल्याच वयाच्या या १५-२० मुलांना बोक्या आणि त्याचा ग्रुप मिळून गाणी,गोष्टी शिकवतात.चित्र काढायला मदत करतात.नेहरू तारांगणला नेऊन आणतात. यातूनच गोष्ट पुढे फुलवत बोक्याचा सत्कार आणि या सामाजिक कार्याबद्दल परदेशातील शिष्यवृत्ती आणि त्या निमित्ताने युरोपची वारी अशी छान खुलवली आहे.
   मित्रानो,यात अशक्य अस काहीच नाही. निदान एखाद्या मुलाच्या मनात या मदतीच्या भावना येण आणि त्याने त्या दृष्टीने प्रयत्न कारण अवघड नक्कीच नाही.पण हे आजूबाजूला दिसतंय का?? उत्तरादाखल नकारार्थी  मान हलली असेल तुमची.आपल्या कॉलनीतले ,सोसायटीतले 'बोक्या' कुठे हरवलेत? '९०च्या  दशकातली मुलं निव्वळ कॉम्पुटर,मोबाईलला चिकटूनअसतात' अशी ओरड आजकाल आपण सतत करतो. अगदी फेसबुक वरून सुद्धा! पण ही मुलं आपल्या आसपास सुद्धा आहेत......जर त्यांनी लहानपणापासून घरात कामवाल्या मावशीनं 'बाई' हाक मारलेली ऐकली तर त्यांना कसा काय जिव्हाळा वाटेल त्या व्यक्तीबद्दल? हजारो रुपयांची विशिष्ट जातीची कुत्री,मांजर तोरा मिळवण्यासाठी पाळायची पण रस्त्यावरच्या प्राण्यांना काही खायला घालायचं नाही.नाहीतर पाठीत धपाटा बसतो. लहान वयातच या आणि अशा अनेक गोष्टी या मुलांच्या मनावर कोरल्या जातात.त्यामुळे काही मोजके अपवाद सोडता आताची लहान मुलं बरीच आत्मकेंद्रित दिसतात.त्यांच्यातून केवळ पैसे छापणारे पदवीधर उदयाला येणार आहेत का?आणि हे असच राहील तर उद्याचे ग्रेस,पुं.ल.,शिरीष कणेकर,सुरेश भट ........नव्हे उद्याचे बोक्या हवे असतील आपल्याला तर आपल्या पिढीची जबाबदारी काय आहे? 


Wednesday 21 March 2012

No Expectations No Demands
रणबीर आणि कतरिनाच्या एका गाजलेल्या चित्रपटात त्याचा एक dialogue होता.साधारण 'मी No Expectations No Demandsअशी मैत्री निभावेन या अर्थाचा.' घाबरू नका, मी त्या चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्या अभिनयाबद्दल काही समीक्षण वगैरे लिहित नाहीये.या   dialogue वर असा विचार आला ,खरंच अशी अपेक्षा न करणार,गृहीत न धरणारी मैत्री शक्य असते?
पटकन कोणीही हो..... म्हणू शकणार नाही.कारण 'मित्र असतातच त्रास द्यायला' हे जगन्मान्य सत्य आहे.मित्र मैत्रिणीन शिवाय एकत्र दंगा कोण करणार?अडीअडचणीला  धावून कोन येणार?'माझी assignment तू लिही' अस हक्काने कोणाला सांगणार,वेळेवर न आल्याबद्दल आपण आधी झापायच आणि पुढच्या वेळी आपणच उशिरा जायचं हे कस करणार?कडकीमध्ये उधार कोण देणार?अशी लांबलचक यादी पटापट डोळ्यासमोर येते. 
काही वेळा आपण लहान गोष्टींसाठी मित्र मैत्रिणींकडून अपेक्षा करतो(ट्रीप वरून यातना आपल्यासाठी नक्की काहीतरी आणतील ),त्यात मजाही असते.पण एखाद्या वेळी त्यांना गृहीत धरल जात आणि त्याचा सर्वांनाच त्रास होतो.आपल्या शिवाय त्यांच्या priority list वर दुसराही कुणी असू शकेल ... एखाद काम,एखादी व्यक्ती,काहीही तर ते लागत मनाला.मग अशी मैत्री शक्यच नसते?की आपण उस गोड लागला म्हणून ....या न्यायाने वागतो जवळच्या लोकांशी.....असा काहीसा विचार चालू होता.इतक्यात कॉलेजमधल्या एका junior मैत्रिणीचा फोन आला.तिला एका लेखासंबंधी काही suggestions हवे होते.त्या बद्दल बोलल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे होस्टेल ला यथेच्छ नावं ठेवली,आणि होस्टेल मधल्या मैत्री आणि unity चा उदो उदो केला,गप्पा मारल्या आणि फोने बंद केला.नंतर लक्षात आल,काही अशी नाती अजूनही आहेत आपल्या जवळ जी सतत संपर्कात नसतात.त्यांच Expectations ,Demands या शब्दांशी त्यांच काहीही नात नसत.ट्रेनच्या प्रवासात भेटलेली एखादी मैत्रीण,कॉलेजमधले Senior आणि Junior वर्गातले अनेक जण,जुन्या तात्पुरत्या म्हणून झालेल्या आणि नंतर बराच काळ टिकलेल्या ओळखी.... यांच्याशी आपण नियमित संपर्कात नसतो.कधी क्वचित मेसेज किंवा facebook वर भेट होत.आपण सहज एखादा विचार शेअर करतो,एखादा सल्ला/माहिती विचारतो....पण ती फार महत्वाची ठरते!कुणी एखादी आठवण सांगत,कुणी अचानक फोन करून,'अमक्या event च नावं सुचाव 'म्हणत..... असे फोन झाल्यावर आपणही खुश असतो की इतक्या दिवसांनी या व्यक्तीने माझी आठवण काढली.... अपेक्षा नसताना कुणी आपली आठवण काढतंय म्हटल्यावर अर्थातच आनंद जास्त होतो.आणि या आनंदात आपणही एखाद्या No Expectations No Demands गटातल्या एखाद्या मित्राला फोन लावतो.अस असाल तरीही आपण जवळच्या मित्र मैत्रिणींशी तटस्थपणाने किंवा संतपणाची भूमिका घेऊन नाही वागू शकत.त्यांच्या सोबत दिलखुलास हसण्या सोबतच त्यांच्यावर चिडण,ओरडण हे सुद्धा स्वाभाविकपणे होतच.मग यांचा समतोल कसा साधायचा?
जवळ असणाऱ्यांवर मोजका हक्क गाजवू आणि इतरांनी दूर जाऊ नये म्हणून असे संपर्कात राहू :)


Friday 10 February 2012

अस्वस्थ अवस्था..
नववीतल्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेची सुरा भोकसून हत्या केली.... ते ही चेन्नई सारख्या मोठ्या आणि शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या शहरात...
चौदा -पंधरा वर्षांचा  मुलगा ,त्याने आयुष्याची अशी किती सुख दु:ख अनुभवली होती की चक्क आपल्या मादाम वडिलांकडे आपल्या तक्रारी करतात म्हणून त्याने त्या शिक्षेकेलाच संपवायचा घाट घातला? की  त्याच्या आई वडिलांनी उत्तम  शैक्षणिक   प्रगतीच फार मोठ ओझ त्याच्या शिरावर ठेवलं होत?
माझ्या मनाला हजार शंका डाचू लागल्या.समुपदेशन आणि विद्यार्थ्यांचा सहवास या दोन गोष्टींमुळे नववी ते पदवी पर्यंतच्या मुलांशी अनेक वेळा संवाद साधता येतो.अशा वेळी पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची घुसमट,मुलांचा बेजबाबदारपणा आणिपालकांच्या जीवाला घोर,उद्धट मुलांमुळे शिक्षकांना मनस्ताप असे अनेक प्रकार पहिले होते.पण या घटनेने अक्षरश: हादरल्या सारख वाटल.
या घटनेतला मुलगा विशेष कुणामध्ये मिसळायचा नाही,बिल्डींग मध्येही खेळायला बाहेर पडायचा नाही 
अस बातमीत म्हटलंय.नक्की का होताहेत अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला? आजकाल मुल इतकी त्रासलेली का आहेत?त्यांना मन मोकळ करता येत नाही का? 
 'बदलती कुटुंब व्यवस्था' हा नेहमीचा टाहो फोडण बंद करून विचार करू....आता सगळ्याच मुलांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही...आणि सध्या तरी आई वडिलानाही पुरेसा वेळ देता येतोच अस नाही.मग ही मुल कुणाशीच बोलत नाहीत का?मग काय काय साचत या मुलांच्या मनात?आज काल लहानपणापासूनच फुकाचे attitude आणि status च्या भ्रामक कल्पना डोक्यात भरवल्या जातात.
आपल्याकडे तमक्या पेक्षा इतक्या वस्तू जास्त किंवा आपल घर/गाडी त्यांच्यापेक्षा महागडी आहे म्हणून आपण जास्त तोरा मिरवायचा,त्यांच्यात मिसळायच नाही..., हे काहीतरी अजीब logic पसरत निघालंय.
बर नातेवाईक म्हणावे तर तेही सणा समारंभात तोरा मिरवायला भेटतात.मग जीवाभावाचे मित्र नसले तर काय करत असतील ही मुल?मला मधेच आठवत,'मुझे मा कि याद आती थी तब मी बाथरूम मी जाकर रोती थी, वरना seniors हसते ना.... ' लहानपणापासून होस्टेलला राहिलेली एक विद्यार्थिनी सांगत होती....
  पण खरच इतक अवघड आहे मन मोकळ करण?ज्यांच्या समोर एकही मुखवटा न घालता वागू असे मित्र मिळण? आपण जसे आहोत,ज्या चुका करतो,जितके वेड्यासारखे जोक मारू ते सगळ ऐकून घेतील असे मित्र .... भले तिसरेच सल्ले देतील पण मनापासून आपल्यासाठी विचार करतील.यश मिळेल तेव्हा jealousy वगैरे शब्दांची सावलीही न पडू देता हक्काने पार्टी मागतील....आपण कधी कधी गृहीत धरतो त्यांना... पण त्यांच्या शिवाय आयुष्य imagine करून पहा....
पार्टी कोणासोबत करणार?शॉपिंग ला कुणासोबत जाणार?उगाच misd cal देऊन पकवणार कोणाला?आणि हक्काने भांडणार/रडणार कुणासमोर?
असे मित्र मैत्रिणी  असण खरच आयुष्यातील खूप सुंदर गोष्ट आहे.
तुमच्या जवळ असे मित्र नसतील तर pls शोधा आणि असतील तर त्यांना मनापासून जपा.tk cr.

Saturday 14 January 2012

सकाळचा प्रकाश!


सकाळचा प्रकाश!
सकाळ सोशल फौंडेशनच्या कार्यक्रमामुळे श्री. प्रवीण कसोटे सर व गरद सर यांच्या समवेत पाथरस ,पिंगळस आणि भालेवडीयेथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला.सुरुवातीला बुजलेली मुलं प्रवीण सरांच्या सुरेल आवाजातील अभंगात स्वत:चा आवाज मिसळू लागली तेव्हा लक्षात आल की त्यांच्या काळाने घेतल्यास ती अभ्यास आणि करिअरबद्दल मार्गदर्शनाच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद देतील.व्याख्यान म्हणण्या पेक्षा अभ्यासातील अडचणी आणि करिअर निवड या  विषयांवर त्यांच्याशी छान गप्पा टप्पा झाल्या!
    मुलांनी गप्पा मारल्या,आपापल्या शंका विचारल्या.... नंतर बराच वेळ कोपऱ्यात ताटकळलेला,गबाळ्या अवतारातला एक  मुलगा पुढे आला आणि म्हणाला,'मादाम,मला अक्षय कुमार व्ह्यायाचय.काय करू त्यासाठी?'आजूबाजूची मुलं हसली,पण 'अरे,त्यात चूक काय आहे,छान स्वप्न आहे त्याच' म्हणत तिथल्या एका मादामनीत्याची बाजू लावून धरली.इतर मुलांची कुजबुज शांत झाल्यावर मी त्याला चित्रपट क्षेत्रातली आणि make up artist सारख्याकाही कोर्सेसची माहिती दिली.थोड बोलण सुरु झाल्यावर त्याच्या तोंडून बाहेर पडल ,'मला आईला लवकरात लवकर मोठ्ठ्या घरात राहायला न्यायचं आहे.शिकून नोकरी शोधायला तर खूप वर्ष लागतील ना! '
मी दोन मिनिट blank च झाले.तो गेल्यावर मघाच्या त्या मादामनी सांगितलं,त्या मुलाचे वडील वारल्यानंतर तो आणि त्याची आई त्याच्या मामाच्या घरी राहायला आले.त्यांचाही घर लहान,परिस्थिती बेतास.कसबस याला शिकायला इकडे पाठवलंय.
         काही वेळा पूर्वी त्याच्या प्रश्नाने माझ्या मनात शंकाच जाळ पसरलं होत.अगदी, टी.व्ही. मुळे मुलं अभ्यास सोडून इतरचगोष्टींचा जास्त विचार करतात इथपर्यंत बरच काही डोकावून गेलेलं.पण आत्ता त्याचा साधा सरळ लॉजिकल विचार माझ्या पर्यंत पोचला.आणि 'आईला मोठ्या घरात न्यायचं आहे' या स्वप्नाच अपार कौतुक वाटू लागल.हळू हळू कळाल ही मुलं वंचित घटकातली होती पण त्याच्या स्वप्नांची झेप खूप मोठी.....कुणी आजूबाजूच्या निसर्गावर कविता रचायच,कुणाच्या हातात मेंदी रेखाटण्याची कला,कुणी उत्तम स्वयंपाकी....
         किती यादी देऊ!! बाहेर पडताना पुन्हा एकदा आशा आकांक्षाना, स्वप्नांना कुंपण नसत हे कळाल.
खरंच, 'सकाळ' मुळे मुलांना भारतातला इंडिया  आणि मला इंडियातला भारत दिसला! 

Saturday 31 December 2011

व्यक्ती तितक्या प्रकृती

व्यक्ती तितक्या प्रकृती 
प्रवासात खिडकीला लागून जागा मिळाली तर प्रवासाचा कंटाळा बराच कमी होतो.असेच एकदा मी आणि माझी मैत्रीणबसमधून पाचेक तासांच्या प्रवासाला निघालो होतो.गप्पांची टकळी अखंड चालू होती हे अधिक सांगणे न लगे.
त्या प्रवासातला एक प्रसंग आठवला.रस्त्यालगत कुणा अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवाने अपघात झाला होता.चारचाकी गाडीची धडक बसल्याने डोक्यातून रक्त येत होत.त्याना दवाखान्यात नेण्यासाठी लोकांची गडबड सुरु होती.आमची बस तिथून पुढे निघाली आणि प्रत्येकाने आपापली मत मांडायला सुरुवात केली.
एक आजोबा म्हणजे 'तरुण पोर आजकालची,न धड बघून चालतात न धड गाड्या चालवतात.'माझ्या मनात विचार आला 'म्हणजे फक्त तरुणांचेच अपघात होतात का?'
'ठोकणारा पाळून गेला असेल साला' इति कुणी काकाश्री.
भले! न पाहता,न ऐकता बेछूट आरोप!
त्यांच वाक्य तोडत एक काकू उद्गारल्या,'घरी कळाल असेल का त्या मुलाच्या?आई बापांच्या जीवाला किती काळजी!'
त्या माउलीला त्याक्षणी  डोळ्यासमोर स्वत:ची मुलं दिसत असावीत!
त्यानंतर भारतातले रस्ते,पावसाळा,गाड्यांचे वेग इथ पासून वाहनांचे कायदे,जबाबदारीची जाणीव पर्यंत
अनेकविध विषयांवर चर्चा झाली.तोपर्यंत गप्प बसलेल्या मैत्रिणीला कोपराने ढोसल,म्हटलं किस दुनियामे हो?
तर madam च्या डोक्यात निराळच काहीतरी चालू होत! म्हणाली,'असे अपघात झाल्यावर ब्लड ग्रुप पाहून पुढची शोधाशोधकरण्यात खूप धावपळ होते,त्यात वेळ जातो.त्यासाठी एखाद अस software  डेव्हलप करूया.....म्हणजे त्यात एका तालुक्यामधल्या ब्लड बँक,हॉस्पिटल्स आणि डोनर्स यांची पूर्ण माहिती असेल.त्यांना contact करता येईल अशी व्यवस्था असेल.'
मी अवाकच! हात जोडले.म्हटलं कुठून सुचलं तुला हे इतक्या कमी वेळात?ती छान हसली.
माझ्या लक्षात आल, एखादी समस्या पाहिल्यावर त्याच्यावर नुसती चर्चा करणे किंवा अमुक चुकतंय,
तमुक सुधारणा व्हायला हवी याची चर्चा करण्यापेक्षा त्यातून एखादी सुधारणेचा एखादा मार्ग शोधणे, निदान 
आपल्या परीने तसा प्रयत्न करणे जास्त महत्वाच आहे.

Tuesday 27 December 2011

हितगुज

१९ आणि २० तारखेला आश्रम शाळेत मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने कर्जतला जाण झाल.
कर्जत पासून दूर आंबिवली या ठिकाणी तीन आश्रम शाळांना आणि एका आदिवासी पाड्याला भेट दिली.
आश्रमशाळा आणि शाळा....... प्रचंड फरक आहे.आपण धावत पळत,आईने दिलेला डबा घेऊन,मित्र मैत्रीणीना हाक मारत शाळेत जायचो,आश्रम शाळेत  केवळ शिक्षणाच्या प्रबळ इच्छेपोटी घरापासून दूर राहणारी,भवतालच्या डोंगर दरयांची चित्र काढणारी,त्यावर कविता रचणारी मुलं पाहिली.'दहावी पास होणे' हेच त्यांच्यासाठी उच्च ध्येय आणि ज्यांना दोन वेळ पोटभर जेवायला मिळत ते सुखी कुटुंब! सातवी-आठवी पास/नापास  मुलींची लग्न यात कुणालाच काही नाविन्य वाटत नाही.
    अशावेळी आपल्या सुखांच्या कल्पनान्सोबत नकळत त्या स्वप्नांची तुलना होते.मोठमोठ्या लाकडाच्या मोळ्या (वजन साधारण नव्वद ते शंभर किलो) उचलणाऱ्या निरागस पऱ्या पाहून 'पा.... च किलो दळण?मला नाही जमणार आणायला' या स्वत:च्या वक्तव्याची उगाचच आठवण येते.इतक्यात कोणीतरी 'आता गावात रिक्षा आली ना..... सोय झाली पाच किलोमीटर वर! नाही तर आधी दहा किलोमीटर चालावं लागायचं.' अस म्हणत .... आता मला वेगळेच प्रश्न पडू लागतात....
खरंच आपण स्वतंत्र होऊन साठहून अधिक वर्ष उलटली?मग रस्ता आणि वीज या दोनच गोष्टी आदिवासींच्या पदरात? आणि त्यात ते धन्यताही मानतात!मग काही दशकांनी दुर्दैवाने आपण पारतंत्र्यात गेलो तर त्यांना खरंच फरक पडेल?
     प्राचीन काळी भारतात विविध समाज आणि प्रांत होते.तिथल्या तिथल्या राजे रजवाड्यांना केवळ स्वत:च्या राज्याची चिंता असायची.बाजूच्या राज्याशी काही घेण देण नाही... असलच तर वैर!  याचा पुरेपूर फायदा परकीयांनी उठवला!
पण पेटून उठतानाही सबंध देश एक व्ह्यायला खूप वेळ लागला.आपल्याच देश बांधवांबद्दल 'मला काय त्याच?'ही भावना होती. किसको दूसरों की पडी हैं? म्हणतात ना त्यापैकी! म्हणूनच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडताना काही जणांनी संसार फुंकून टाकले तर काहींनी ब्रिटीशांच्या हाताखाली राबत 'फायर' च्या तालावर स्वत:च्याच बांधवाना मारण्यात धन्यता मानली! अखेर...लुटण्यासारख काही राहिलं नाही.... आपल्याला देशाला फाडून,पुरेशी हिंसा आणि धार्मिक द्वेष  पसरवून साहेब परत फिरला.
 पण.......
 देश पारतंत्र्यात होता आणि देश स्वतंत्र झाला या दोन्ही परिस्थितींचा तेव्हाही पुं.लं.च्या 'अंतू बर्वा' ला काही फरक पडला नाही.
कारण त्याला दोन्ही वेळा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होतीच! साहेब होता तेव्हाही आणि साहेब गेला तेव्हाही! मग आज इतक्या वर्षांनंतर परिस्थिती वेगळी आहे का?
   राजे राजवाड्यांची जागा घोटाळा किंग्सनी घेतली आहे.अजूनही देशाचे सीमाप्रश्न अनुत्तरीत आहेत.महानगरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.सामान्य माणूस जगण्यासाठीच इतका संघर्ष करतो....शिक्षण,नोकरी,महागाई.... यात त्याला सामाजिक प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळच नाही.मग वंचित घटकांकडे कोण पाहणार? काही स्वयंसेवी संस्था आणि खरंच विकासाची तळमळ असणारे अधिकारी यांच्या आधारावर त्यांची प्रगती मूळ धरत आहे.ही परिस्थिती बदलेल?